कबीरधाम : जिल्ह्यातील सुमारे ७,००० शेतकऱ्यांनी गेल्या गळीत हंगामात पंडारिया येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सहकारी साखर कारखान्याला ऊस पाठवला. हा ऊस गाळप होवून जवळपास १० महिने उलटले आहेत. तरीही शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत. कारखान्याकडे सुमारे १० कोटींची ऊस बिले थकीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या थकीत ऊस बिलांप्रश्नी किसान काँग्रेसने सोमवारी पंडारिया उप जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आणि आपल्या ९ कलमी मागण्यांसह निवेदन सादर केले.
‘अमर उजाला’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी काँग्रेसने पंडारिया येथील नवीन बस स्थानकाजवळ एक जाहीर सभा आयोजित केली. यावेळी जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष रवी चंद्रवंशी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शेतकरी गेल्या दहा महिन्यांपासून स्वतःच्या पैशांसाठी कारखान्याच्या फेऱ्या मारत आहेत. जवळपास १० कोटी रुपये थकीत आहेत. तरीही, कारखाना व्यवस्थापन लक्ष देत नाही. शेतकऱ्यांची महसूल कार्यालयात कामे होत नाहीत. सरकारने वीज दर वाढवून शेतकरी आणि सामान्य जनतेचे शोषण चालवले आहे. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अभिषेक मिश्रा म्हणाले की, गेल्या दहा महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकरी पैशांसाठी हेलपाटे मारत आहेत. जर शेतकऱ्यांना पुढील दहा दिवसांत पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर रायपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल.