नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (एमओपीएनजी) सरकार इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, असे विविध माध्यमांच्या वृत्तांतातून सूचित झालेले दावे फेटाळून लावले. हे वृत्तांकन दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, माध्यमांच्या एका भागात असे वृत्त आहे की भारत ईबीपी कार्यक्रमांतर्गत इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. पण, भारतात इथेनॉल मिश्रण “रोडमॅप फॉर इथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया २०२०-२५” नुसार लागू केले जात आहे. ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणाऱ्या इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२५-२६ पर्यंत वार्षिक मिश्रण लक्ष्ये निश्चित करते. सध्या आम्ही ईएसवाय २०२४-२५ मध्ये आहोत. ते वर्ष ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपत आहे. चालू रोडमॅपनुसार, आगामी ईएसवाय (१ नोव्हेंबर २०२५ पासून) साठी मिश्रण लक्ष्य २० टक्यांवरच कायम आहे.
गेल्या दशकात ईबीपी कार्यक्रमाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इएसवाय २०२३-२४ पर्यंत, यामुळे शेतकऱ्यांना ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्वरित देण्यात आली आहे. १,००,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे. सुमारे ५७६ लाख मेट्रिक टन निव्वळ CO2 कमी झाले आहे आणि १९० लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. इएसवाय २०२५-२६ नंतर इथेनॉल मिश्रण लक्ष्यांसाठी, भविष्यातील लक्ष्यांची शिफारस करण्यासाठी सरकारने एक आंतर-मंत्रालयीन समिती (आयएमसी) स्थापन केली आहे. आयएमसीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. आयएमसीने शिफारस केलेले इथेनॉल मिश्रण लक्ष्य इएसवाय २०२६-२७ पासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होतील. अशाप्रकारे, या टप्प्यावर २७ टक्के मिश्रणाच्या नियोजित वाढीबद्दलचा कोणताही दावा काल्पनिक, दिशाभूल करणारा आणि खोडसाळ आहे.
इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ईबीपी कार्यक्रम सुरू झाल्यापासून, २०१३-१४ च्या ईएसवायमध्ये इथेनॉल मिश्रण ३८ कोटी लिटरवरून २०२३-२४ च्या ईएसवायमध्ये ७०७.४ कोटी लिटरपेक्षा जास्त झाले आहे. या विस्तारामुळे भारताला २०२३-२४ च्या ईएसवाय दरम्यान सरासरी १४.६ टक्के इथेनॉल मिश्रण दर साध्य करण्यास मदत झाली. चालू वर्ष २०२४-२५ दरम्यान, जून २०२५ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण १९.९ टक्यापर्यंत पोहोचले. नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ पर्यंत एकत्रित सरासरी मिश्रण दर १८.९ टक्के होता.