नवी दिल्ली : साखरेचा दर आणि इथेनॉलचा विक्रीदर हे दोन मोठे स्रोत कमकुवत झाल्याने साखर उद्योगावर गंभीर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला कारखाना स्तरावरील साखरेचा दर प्रति क्विंटल ३,८५० रुपये होता. तो जवळपास तीनशे रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी इथेनॉलचा विक्री दर तीन वर्षांपासून गोठलेला असून वाटपही अपुरे आहे. त्यामुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती चिंताजनक आणि दूरगामी परिणाम करणारी असल्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पंतप्रधान, केंद्रीय सहकार, गृह व अन्न मंत्र्यांना सविस्तर निवेदने देऊन भेटीची वेळ मागितली आहे. सद्यस्थितीत ऊस उत्पादकांना १४ दिवसांत बिले देण्याची कायदेशीर अट पूर्ण करणे साखर कारखान्यांना कठीण झाली असल्याची चिंता महासंघाने व्यक्त केली आहे.
महासंघाने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिकिलो ४१ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, ऊस-आधारित कच्च्या मालासाठी इथेनॉल दरवाढ आणि ऊस व धान्य-आधारित इथेनॉलचे न्याय्य वाटप करण्यात यावे आणि अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी आणखी पाच लाख टन साखर निर्यातीची परवानगी देण्यात यावी, या तीन प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम उशिराने सुरू होऊनही वेगाने पुढे जात असला तरी साखर उद्योग गंभीर आर्थिक ताणाखाली आहे. ऊस उत्पादकांना १४ दिवसांत बिले देण्यासाठी बँकांकडून वाढीव कर्ज घेऊन व्याजभार वाढवावा लागत असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
















