कोल्हापूर : असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ‘एफआरपी’पेक्षा १४७ रुपये जादा दर दिला आहे. हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. हंगाम २०२३-२४ साठी कार्यक्षेत्रातील ९,८२६ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. कारखान्याच्या सभासदांनी ऊस गळीतास पाठवून हंगाम यशस्वी करावा, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगाम मुहूर्तप्रसंगी आमदार सतेज पाटील बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली. तर संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी मंगल यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. कारखान्याचे व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. गावडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील उपस्थित होते.















