कोल्हापूर : गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आगामी, २०२४-२५ या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मातोश्री सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते हे पूजन झाले. आगामी गळीत हंगामात कारखान्याने साडेपाच लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. कारखान्याने ठरविलेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी हंगाम पूर्वतयारी सुरू केली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी दिली.
कार्यकारी संचालक पाटील यांनी सांगितले की, हा कारखान्याचा २२वा गळीत हंगाम आहे. जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे संचालक खंडेराव घाटगे, दत्तात्रय पाटणकर, बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, महादेव पटवर, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव आदी उपस्थित होते.











