चीनसोबत करार झाला, भारतासोबत “मोठा करार” होण्याच्या मार्गावर : ट्रम्प

वॉशिंग्टन, डीसी [अमेरिका]: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने चीनसोबत करार केला आहे आणि लवकरच भारतासोबत “खूप मोठा” करार होण्याच्या मार्गावर आहे. ट्रम्प यांनी बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना ही टिप्पणी केली. ट्रम्प म्हणाले, प्रत्येक देश करार करू इच्छितो आणि त्यात सहभागी होऊ इच्छितो. आमचे काही उत्तम करार होत आहेत. ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, इतर सर्वच राष्ट्रासोबत करार केले जाणार नाहीत.

ते म्हणाले, आम्ही सर्वांशी करार करणार नाही. काही देशांना आम्ही फक्त एक पत्र पाठवणार आहोत, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला २५, ३५, ४५ टक्के पैसे द्यावे लागतील. ते करण्याचा हा सोपा मार्ग आहे. त्याचबरोबर ते म्हणाले, पण आमचे काही उत्तम करार होत आहेत. कदाचित भारतासोबत. खूप मोठे करार होणार आहेत. जिथे आम्ही भारताला खुले करणार आहोत. आमचे प्रत्येक देशाशी संबंध खूप चांगले राहिले आहेत,असे त्यांनी पुढे म्हटले. तथापि, ट्रम्प यांनी चीनसोबत झालेल्या कराराच्या तपशीलांची माहिती दिली नाही.

या महिन्याच्या प्रारंभी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये बोलताना अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले होते की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लवकरच अंतिम केला जाऊ शकतो. मला वाटते की आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत आणि लवकरच अमेरिका आणि भारत यांच्यात करार होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, १० जून रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, भारत आणि अमेरिका एक निष्पक्ष आणि समतोल व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ज्यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांना फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here