लातूर : जिल्ह्यातील बेलकुंड (औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड यंत्रणा सुरळीत नसल्यामुळे कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्यापही गाळपाविना शेतातच आहे. शेतकरी ऊस नेण्यासाठी दररोज कारखान्यावर हेलपाटे मारत आहेत. शुक्रवारी शिंदाळा येथील शेतकरी अण्णाराव मुळे यांनी उसाच्या गव्हाणीत ठाण मांडले. अडीच महिन्यानंतरही तोडणी यंत्रणा सुरळीत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
वानवडा येथील शेतकरी सभासद संतोष काळे यांच्या उसाची तोड नोव्हेंबरमध्येच होती. मात्र, जानेवारी संपत आला तरी ऊस नेला जात नाही. त्यामुळे उसाच्या वजनात घट होत असल्याचे काळे यांनी सांगितले. कारखान्याने ७६ दिवसांत १ लाख १६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. दररोज १७०० ते १८०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याचा सरासरी उतारा ९.६१ आहे. कार्यक्षेत्रात अद्याप ३,७०० हेक्टरवर ऊस उभा आहे. कारखान्याकडे पुरेसे ऊसतोड मजूर व वाहने नसल्यामुळे प्रशासन आणि शेतकरीही हतबल झाले आहेत. तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे पाणी अत्यल्प आहे. आता उसाला पाणी कसे द्यावे, या चिंतेत शेतकरी आहेत. दरम्यान, कार्यकारी संचालक रवी बरमदे म्हणाले की, परिस्थिती सुधारण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही.


















