एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाईस जाणूनबुजून टाळाटाळ : आंदोलन अंकुश

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना साखर सहसंचालकांचे अभय असल्याचा आरोप ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी केला. वारंवार तारखा देण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांच्यासमोर उपस्थित केला. ऊस घेतल्यानंतर केवळ १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे आवश्यक आहे, तरीही साखर कारखान्यांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जात नाही. याबाबत सहसंचालकांनी सुनावणी पूर्ण करून वरिष्ठांना जप्तीबाबत कारवाई करण्याबाबत अहवाल देणे आवश्यक आहे. मात्र, तो देण्यासाठी सहसंचालकांकडून टाळाटाळ होत असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

चुडमुंगे म्हणाले, सुमारे ६५० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ३१ मार्चपर्यंत पीक कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. सध्या शेतकऱ्यांचे पैसे कारखानदार वापरत आहेत. यात शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. जिल्ह्यातील १२ कारखान्यांनी उसाची बिले थकवली आहेत. सांगली जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी बिले दिलेली नाहीत. साखर सहसंचालक तारीख पे तारीख देत आहेत. थकीत बिले पंधरा टक्के व्याजाने देण्याची जबाबदारी सहसंचालक यांची आहे. दहा मार्चला सुनावणीत व्याजासहीत पैसे द्या, म्हणून अहवाल पुणे आयुक्त कार्यालयाला न पाठवता तीन एप्रिलाला पुन्हा सुनावणी ठेवली आहे. कोणतेही कारण नसताना मुद्दाम ऊस बिले थकवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here