शामली : भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी थकीत ऊस बिलासह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. थकीत बिले त्वरीत न दिल्यास तीव्र आंदोलन केले जातील. राज्यातील गैर प्रकारांवर, बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत कारवाईची मागणी करणारे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोमवारी भाकियूच्या कार्यकर्त्यांनी अॅड. चौहान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शामली जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांकडे सुमारे ८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊस गळीत हंगाम समाप्त होत असताना आतापर्यंत एकाही महिन्याचे ऊस बिल पूर्णपणे मिळालेले नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार ऊस पाठवल्यानंतर १४ दिवसांत बिले देणे गरजेचे आहे. शेतामधील ऊस पूर्ण गाळप होईपर्यंत कारखाना सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना औषधे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, ऊस तोडणी होईपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये आदी मागण्यात करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.















