नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची विधानसभेत मागणी

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (ता.15) विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली. यावर राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत सांगितले की, २०१७ आणि २०२३ मध्ये झालेल्या चौकशी अहवालांमध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. यावर सरकार कोणती कारवाई करणार आहे? असा सवाल त्यांनी विचारला.

आमदार प्रवीण दटके यांनी गेल्या 16 वर्षांपासून बकरा मंडीतील गाळ्यांच्या व्यवहारातून तब्बल 51 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे सांगितले. हा पैसा शासनाचा आहे, कोणत्याही व्यक्तीचा नाही. ज्यांनी हा गैरव्यवहार केला, त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले की, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीतून जे मुद्दे समोर आले आहेत, ते खरे आहेत. या प्रकरणात आणखी चौकशीची गरज नाही. समितीच्या माध्यमातून उघड झालेल्या सर्व गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here