नवी दिल्ली : चालू साखर हंगाम २०२४-२५ मध्ये साखरेच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले आहे. साखरेचे उत्पादन १५ मे २०२५ अखेरपर्यंत १८ टक्क्यांनी घटले आहे. यंदाच्या हंगामात २६१.१० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा उत्पादन घटले असले तरी आगामी हंगामात साखरेचे बंपर उत्पादन होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चालू हंगामाचा क्लोजिंग साठा ५० लाख टन असला तरी साखरेच्या दरात वाढ होणार नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केंद्रीय अन्न सचिवांनी खाद्यतेलाच्या दरात थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असली तरी साखरेचे दर स्थिर राहातील, दरवाढ होणार नाही असे स्पष्ट केले आहे. याबाबत ‘झी बिझनेस’मध्ये प्रसारीत झालेल्या वृत्तानुसार, कृषी तज्ज्ञ जी. के. सूद यांनी साखरेचा क्लोजिंग साठा ५० लाख टन राहिल असे सांगितले. ते म्हणाले की, उत्पादन घटल्यानंतरही साखरेच्या दरात तेजी येईल, अशी शक्यता नाही. साखरेचा दर स्थिर राहिल. साखरेच्या वापराबाबत जो प्रचार होत आहे, त्यामुळे देशांतर्गत मागणी कमी होत आहे. यावर्षी ५ लाख टन खप कमी होईल अशी शक्यता आहे. पुढील हंगामात साखर उत्पादन बंपर असेल. साधारणतः २९० ते ३१० लाख टन साखर उत्पादन होऊ शकेल.