धाराशिव : जिल्ह्यात गेल्या वर्षी ऊस लागवड वाढल्याने यंदा तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र उपलब्ध आहे. जिल्ह्यात साधारण ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. १३ साखर कारखान्यांकडून गाळप हंगामही वेगात सुरू आहे. आतापर्यंत ३३ लाख टनांवर उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. अजूनही ४० लाख टन ऊस शिल्लक असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. बहुतांश उसाचा एक वर्षाचा परिपक्वता कालावधी संपून गेला आहे. त्यामुळे उसाला तुरे फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी १४ महिन्यानंतरही ऊस शेतकऱ्यांच्या शेतात आहे. त्यामुळे वजन कमी होऊन शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसू लागला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात २५ ते २८ हजार हेक्टरवरील ऊस तोडणी बाकी आहे. त्यामुळे एकूण विचार करता शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. ऊस तोडणीसाठी १२ महिन्यांची मुदत असते. त्यानुसार आलेल्या तारखेला उसाची तोडणी केली जाते. उसाच्या ८६०३२ आणि ८००५ या जातीना लवकर तुरा येत नाही. इतर म्हणजे २६५ या जातीचे क्रॉसिंग आहे, अशा जातींच्या उसाला लवकर तुरा येतो, असे शेतकरी पांडुरंग आवाड यांनी सांगितले. उसाला फुलोरा आल्यानंतर १.५ ते २ महिन्यांपर्यंत उसाच्या उत्पादनामध्ये आणि साखर उताऱ्यामध्ये विशेष अनिष्ट परिणाम होत नाही. उलट फुलोरा आल्यामुळे त्या उसाची पक्वता लवकर येते. त्यामुळे तो ऊस लवकर तोडणीसाठी घेता येतो. म्हणून साखर कारखान्यांना हंगाम सुरु झाल्यानंतर प्रथम उसाची पक्वता पाहून तोडणी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

















