धाराशिव : जिल्ह्यात ५० लाख टन ऊस गाळप, सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल

धाराशिव : यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात सध्या १४ सहकारी व खासगी साखर कारखाने आणि चार गूळनिर्मिती कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. यंदा कारखान्यांकडून प्रतिटन अडीच ते तीन हजार रुपये दर दिला जात आहे. या दराचा विचार करता ५० लाख टन ऊस गाळपातून झालेली ही दीड हजार कोटींची उलाढाल जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी महत्वाची मानली जात आहे. या ऊस हंगामामुळे केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ग्रामीण अर्थचक्राला मोठी गती मिळाली आहे.

पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी उसाचे पीक घेत. मात्र जवळपास साखर कारखाने नसल्यामुळे शेतकरी त्याची गूळनिर्मिती करत होते; मात्र, गेल्या काही वर्षांत कारखान्यांची संख्या वाढत गेल्याने गूळनिर्मिती जवळपास बंदच झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकादा तरी साखर कारखाना आहे. या सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५० लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले आहे. शिवाय चार गूळनिर्मिती कारखान्यांनीही परिसरातील ऊसाचे गाळप केले आहे. यंदा कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने ऊस गाळपाबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २८ वर्षांत जिल्ह्यात कारखान्यांचे जाळे विस्तारले. साखर हंगामाचा फायदा ऊस तोडणी मजूर, कारखान्यातील कामगार, ऊस वाहतूक करणारे वाहनमालक, चालक तर अप्रत्यक्ष रोजगार कारखाना परिसरातील हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, गॅरेज मालक आणि छोटे विक्रेते यांना मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here