धाराशिव : पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने ठोस पाऊल टाकत कंचेश्वर येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीजने सीबीजी (Compressed Biogas) प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली. 10 टीपीडी क्षमतेच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी गाळप हंगाम 2025-26 मध्ये उत्पादित झालेल्या 12,70,791 व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख, जैक्सन ग्रीन व अल्टानोवा बायो एनर्जीचे संचालक कृष्णन कन्नन, सीईओ चंदन गोस्वामी, अनुप गुप्ता तसेच दीपशिखाताई देशमुख यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी वैजनाथ शिंदे, अशोकराव काळे, लक्ष्मणराव मोरे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते.
चालू गळीत हंगामात मांजरा कारखान्याने धाराशिव जिल्ह्यात साखर उताऱ्यात प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. याच पार्श्वभूमीवर उच्चांकी उस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांचा सन्मान करण्यात आला. दिलीपराव देशमुख म्हणाले, सीबीजी प्रकल्प म्हणजे केवळ उद्योगवाढ नाही, तर पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आहे. धिरज देशमुख म्हणाले कि, मांजरा शुगरने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत प्रगती साधली आहे. हा सीबीजी प्रकल्प शेतकऱ्यांना अतिरिक्त मूल्य देणारा आणि भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असेही ते म्हणाले.


















