धाराशिव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्यातर्फे ‘एआय’ला प्रोत्साहन, २५ शेतकऱ्यांची निवड

धाराशिव : केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने ऊस पिकात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तंत्रज्ञान प्रकल्प राबविण्यास सुरवात केली आहे. बेंबळी आणि टाकळी येथील २५ निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर हे तंत्रज्ञान राबविण्यात आले आहे. कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष अरविंद गोरे यांनी त्याची पाहणी करून तंत्रज्ञानाच्या वापरातील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी गोरे यांनी, शेतीमध्ये बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादकांच्या कष्टाचे चीज होईल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, या हेतूने आम्ही हा प्रकल्प राबवित आहोत असे सांगितले.

संस्थापक-अध्यक्ष गोरे यांनी या दौऱ्यादरम्यान कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसह जाऊन प्रकल्पात सहभागी झालेल्या २५ शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. ऊस शेतीमध्ये पीक संरक्षण, खतांचे नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन अधिक अचूक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. यावेळी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान वापरताना येणाऱ्या अडीअडचणी मांडल्या. गोरे यांनी त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. उत्पादन खर्चात घट होऊन उसाची उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अॅड. नीलेश पाटील, भारत गुंड, राहुल सूर्यवंशी, सतीश मुंगळे, फखरुद्दिन शेख व भारत सोनटक्के आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here