धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये दिला असताना सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक चार हा कारखाना सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता २,८०० रुपये देत आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पहिला हप्ता ३,००० रुपये मिळावा यासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. शिवसेना (उबाठा) युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी सुभाष भोसले यांच्यासह शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत. दरम्यान, कारखान्याने आता २,८०० रुपये व नंतर २०० रुपये दिले जाणार आहेत असे सांगितले. हा तोडगा शेतकऱ्यांनी अमान्य केला.
युवा सेनेच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला परिसरातील ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना (उबाठा) युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी सुभाष भोसले यांच्यासह शंकर मेटकरी, नवल गाडे, सचिन सुरवसे, शंकर पाटील, कल्याण लुबाळ, नाना गाढवे, नीलेश ढाळे, विकास रोकडे, परमेश्वर लुबाळ आदींसह असंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. याबाबत कारखान्याच्यावतीने सुरेश सावंत, श्री. काझी, श्री. पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. कारखान्याने आता २,८०० रुपये जमा केले आहेत. दिवाळीत उर्वरीत २०० रुपये प्रतिटन देऊ असे सांगितले. मात्र कारखान्याने गेल्यावर्षी ठरले २०० रुपये अद्यापही दिले नाहीत. त्यामुळे यावर्षी पूर्ण ३००० रुपये द्यावेत या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ३००० रुपये मिळतात, मग सांगोला तालुक्यातील उसाला २८०० रुपये का असा सवाल या शेतकऱ्यांचा आहे.

















