धाराशिव : उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांवर ऊसतोडीचा दुहेरी आर्थिक भार पडत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. एका बाजूने कारखान्यांकडून उसाचा हप्ता थकलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला ऊसतोडीसाठी मजूर व काही साखर कारखान्यांच्या संबंधित व्यक्तींनी पाच हजार रुपये घेतल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
ऊसतोड पथकांनी वेळेत यावे, तोडणी वेगाने व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून सरळसरळ पैसे मागितले जात आहेत. हमीभावही जाहीर नाही, हप्ता मिळत नाही आणि आता ऊस तोडण्यासाठीही अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत, मग आम्ही जगायचं कसे?, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. साखर कारखान्यांनी अद्याप चालू हंगामासाठी उसाचा हमीभाव जाहीर केलेला नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
शेतमालावर होणारा खर्च, मजुरी, वाहतूक अशा वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ऊसतोडणीतील गैरव्यवहार, अतिरिक्त वसुली तसेच बिलाचा थकीत हप्ता याबाबत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सरकार व कारखान्यांनी तातडीने हस्तक्षेप करून ऊस दर जाहीर करावा, थकीत हप्ते अदा करावेत आणि ऊसतोडीतील अनियमितता रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

















