धाराशिव : यंदा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी हार्वेस्टरच्या साह्याने उसाची तोडणी सुरू केली आहे. कारखान्याच्या जवळच्या अंतरात बैलगाडीच्या साह्याने वाहतूक करून मजुरांकडून तोडणी सुरू आहे. यामुळे बैलगाड्या व हार्वेस्टरचे स्वतंत्र तोडणी वेळापत्रक (प्रोग्राम) तयार करण्यात आले आहे. यात हार्वेस्टरचा प्रोग्राम वेगाने सुरू आहे. बैलगाड्यांचा प्रोग्रॉम अडीच ते तीन महिने उशिराने सुरु आहे. त्यामुळे मजुरांकडून तोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलगाडी येण्याची आशा सोडून आता मिळेल त्या कारखान्याच्या हार्वेस्टरकडून तोडणी सुरू केली आहे. याचा फायदा हार्वेस्टरचे मालक घेत असून ‘दक्षिणा’च्या नावाखाली एकरी सहा हजार रुपयाची मागणी करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
खरेतर हार्वेस्टर तोडणीवेळी ऊस कांड्या फडात पडतात. त्या वेचून हार्वेस्टरमध्ये टाकण्यासाठी मजुरांचा खर्च वेगळा करावा लागतो. काही शेतकऱ्यांना हा ऊस वेचून वाहनाचा खर्च करून नेऊन द्यावा लागतो. त्यामुळे यापूर्वी शेतकरी हार्वेस्टरच्या तोडणीला विरोध करत होते. आता एकूणच तोडणीला उशीर होत असल्याने मिळेल त्या कारखान्याच्या हार्वेस्टरकडून तोडणीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. याचा फायदा हार्वेस्टरची मंडळी उचलत आहे. ऑपरेटरपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकरच्या चालकांना दक्षिणा म्हणून एक ते दोन हजार रुपये द्यावे लागत आहेत. त्यांच्यासाठी जेवणाचा खर्च वेगळा करावा लागत आहे. एकरी दोन ते तीन हजार रुपयाची मागणी मालकांकडून होत असून येत्या काळात त्यात वाढ होईल, असे शेतकरी सांगत आहेत. कळंब तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी मोहन माळी यांनी सांगितले की, हार्वेस्टरमालकाने एकरी दोन हजार रुपयाची मागणी केली. ऑपरेटर व ट्रॅक्टर चालकांची दक्षिणा वेगळीच होती. त्यांच्या जेवणाचा खर्चही दिवसाला दीड हजार रुपये होता. तर तोडणी मजुरांना साडेपाच हजार रुपये द्यावे लागल्याचा अनुभव धाराशिव तालुक्यातील कोंड येथील शेतकरी जगन्नाथ भुजबळ यांनी सांगितला.

















