धाराशिव : कळंब तालुक्यातील गुळ पावडर कारखानदारांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन २४०० रुपये दर जाहीर केला आहे. तर गेल्यावर्षी प्रति टन २७०० रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी अत्यल्प दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कमी दरामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विष्णू काळे आणि संघटनांनी प्रतिटन ३,२०० रुपये एकरकमी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. या अनुषंगाने गावोगावी घोंगडी बैठक घेतल्या जात आहे.
तालुक्यात वाठवडा, मोहा, मसवाडी येथे गुळ पावडर कारखाने आहेत. यावर्षी कमी दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. साखर कारखान्यांप्रमाणेच उसाला जादा दर द्यावा अशी मागणी केली जात आहे. वाढलेला उत्पादन खर्च, खते, औषधे आणि मजुरीच्या दरातील वाढ यामुळे सध्याचा दर कोणत्याही परिस्थितीत परवडणारा नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुळ कारखान्यांनी जादा ऊस दर दिला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. गुळ कारखानदारांनी एफआरपीपेक्षा ८०० रुपये कमी दर देणे चुकीचे असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विष्णू काळे यांनी सांगितले.