धाराशिव : सुधारित कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम आहे तसेच शेती व्यवसायामध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे नॅचरल शुगरच्या व्यवस्थापनातर्फे महिलांच्या शेतीशाळा घेण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. कृषिरत्न बी. बी ठोंबरे, शेती कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग आवाड, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर, सहायक कृषी अधिकारी पंडित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये महिलांची शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन केले. शेतीशाळांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांनी ऊस शेतीतील नवतंत्रज्ञानाची माहिती महिलांनी जाणून घेतली.
ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी यावेळी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे उत्पादित वसंत ऊर्जा, हरितके, स्फुरद आणि पालाश विरघळणारे जिवाणू असलेले विश्वात्मा या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करण्याचे आवाहन केले. ऊस पिकांमधील पिवळसरपणा, पोक्का बोईंग रोग व्यवस्थापन, जमिनीमधील घातक बुरशींचे व्यवस्थापन आदींबाबत येळकर यांनी माहिती दिली. अनुदानाचा लाभ घेऊन ड्रोनच्या चुनखडीयुक्त शेत जमिनीमधील साह्याने फवारणीबाबतही त्यांनी माहिती दिली. यावेळी महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.