धाराशिव : दरवर्षी ऊसतोडीसाठी परराज्यात जात उदरनिर्वाह भागविणाऱ्या, जांब (ता. भूम) येथील कष्टकरी कुटुंबातील शिवराज कल्याण भोरे यांनी कठोर परिश्रम घेत अभ्यासात सातत्य राखून शिक्षण पूर्ण केले. मर्यादित साधनसामग्री, आर्थिक ताण तसेच अभ्यासासाठी अपुरी सुविधा असूनही हार न मानता अभ्यास सुरू ठेवला. दिवस-रात्र मेहनत घेत त्यांनी सीएच्या कठीण परीक्षेत यश संपादन केले. या ऊसतोडणी मजूर शेतकऱ्याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही पदवी संपादन केली. या यशामुळे जांब गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
शिवराज यांनी मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या त्यागाच्या बळावर हे यश मिळवले. शिवराज यांचे प्राथमिक शिक्षण पाथरुडच्या भाऊराव काटे विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी.कॉम. पदवी संपादन केली. २०१९ मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमाची पहिली परीक्षा उत्तीर्ण केली. नंतरच्या पुढील टप्प्यांत परीक्षा पूर्ण करीत जानेवारी २०२६ मध्ये लागलेल्या निकालात ते यशस्वी ठरले. त्यांच्या यशाची बातमी समजताच मित्रांनी पेढे भरवून अभिनंदन केले. सरपंच समाधान भोरे यांच्यासह गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

















