धाराशिव : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने २०२४-२५ च्या हंगामामध्ये गाळप केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के बिल अदा केले आहे. यामध्ये नियमित गाळपासाठी प्रति मे.टन दोन हजार ७०० तर उशिरा आलेल्या उसासाठी दोन हजार ८०० रुपये इतका दर देण्यात आला असल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनातर्फे देण्यात आली.
यंदा कारखान्याने एकूण दोन लाख १८ हजार २८६ मे.टन ऊस गाळप केला आहे. एफआरपीनुसार याचा दर दोन हजार ३४३.५९ प्रति मे.टन होता; मात्र कारखान्याने यापेक्षा अधिक दर देत, शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ६० कोटी ९८ लाख २४ हजार इतकी रक्कम थेट वर्ग केली आहे. एफआरपीनुसार मिळणारी रक्कम ५१ कोटी १५ लाख ७२ हजार इतकी होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना नऊ कोटी ८२ लाख ५१ हजार ६७१ रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळाली आहे. प्रति मे.टन पाचशे रुपये जादा दरामुळे ऊस उत्पादकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येत्या हंगामासाठी ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधाव, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.