धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीजने इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याने ४५ केएलपीडी क्षमतेच्या आधुनिक आसवनी प्रकल्पातून इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याने एकूण १ कोटी ६ लाख लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी टेंडर दाखल केले होते. ऑइल कंपन्यांनी केलेल्या निविदांच्या प्रक्रियेनंतर मांजरा शुगरला ५७ लाख ९४ हजार लिटर इथेनॉल पुरवठ्याची मंजुरी मिळाली आहे. यापैकी पहिला टैंकर गुरुवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. पाकणी (सोलापूर) डेपोकडे रवाना झाला. केंद्र सरकारने देशांतर्गत इंधनात स्वावलंबी होण्यासाठी इथेनॉलला चालना देण्याच्या धोरणात सहभागी होत कारखान्याने साखर उद्योगात नवा अध्याय जोडला आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या तिमाहीतील इथेनॉलचा पहिला टँकर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. पाकणी (सोलापूर) डेपोकडे रवाना करण्यात आला. इथेनॉल टँकरचे पूजन कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नागेश नडमशेटवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित कदम, जयदेव कदम, बाळासाहेब पेठे, मनोज तायडे, गोकुळ थावरे, अभय तिवारी आदी उपस्थित होते. आगामी काळात गतीने इथेनॉल उत्पादन केले जाईल अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.


















