धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून पैसे दिलेले नाहीत. याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. साखर कारखान्यांकडील साखर जप्त करून शेतकऱ्यांना उसाची एफआरपी मिळावी अशी मागणी त्यांना राज्याचे साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली आहे. पुणे येथे मंगळवारी याबाबत साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले अद्यापही दिलेली नाहीत. काही साखर कारखान्यांनी उसाचे अंतिम बिलही दिलेले नाही. उसाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे साखर आयुक्तांनी संबंधीत कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई करुन कारखान्यांनी उसाची एफआरपी द्यावी. शेतकऱ्यांचे पैसे आठ दिवसांत न मिळाल्यास कारखान्याविरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.