धाराशिव : रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये एकूण १३.२५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्याप्रमाणे ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार आतापर्यंत अत्यंत समाधानकारक गाळप होत आहे. सध्या कारखान्याने सरासरी दररोज ७,५०० टन याप्रमाणे ऊस गाळप करण्यात येत आहे. गाळपास आलेल्या उसाला ३,००० रुपये प्रतिटन पहिली उचल विनाकपात देण्यात येणार आहे, अशी माहिती नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.
ठोंबरे यांनी सांगितले की, कारखान्याचा २४ वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे. सध्या साखरेचे दर घसरत आहेत. तरीही यंदा ३,००० रुपये पहिली उचल विनाकपात देण्याचा निर्णय घेतला आहे. दर पंधरा दिवसांनी ऊस बिल पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. कारखान्याने चांगल्या प्रकारे तोडणी, वाहतूक यंत्रणेची व्यवस्था केली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी उसाचा पुरवठा करावा, तरच उसाचे गाळप करून जादा दर देणे शक्य होईल. कारखान्यांच्या विविध उपक्रमाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नांमधून सुद्धा उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.


















