धाराशिव : नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मिल रोलरचे पूजन नुकतेच करण्यात आले. कारखान्याने २०२५-२६ च्या गाळप हंगामामध्ये बारा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक तेवढा ऊस उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन ठोंबरे यांनी यावेळी केली.
अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, रोलर पूजनामुळे कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होऊन कामास गती प्राप्त होते. यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून, कारखाना निर्धारित वेळेत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे येत्या गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रसामग्रीची साफसफाई दुरुस्ती व देखभालीची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे संस्थापक अध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले. कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर अनिल ठोंबरे, प्रवर्तक, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.