धाराशिव : जागजी येथील एनव्हीपी शुगरने द्वितीय गळीत हंगामात तिसऱ्या पंधरवड्यामध्ये १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाचे अडीच हजार रुपयांप्रमाणे ऊसबिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारी (१ नोव्हेंबर) जमा केल्याची माहिती अध्यक्ष बालाजी पाटील यांनी दिली. एनव्हीपी शुगरने चाचणी गळीत हंगामावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ दिवसांत जमा करण्यात येत आहे.
अध्यक्ष बालाजी पाटील म्हणाले, ही परंपरा द्वितीय गळीत हंगामात देखील कारखान्याने जोपासली आहे. यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवडा संपल्यावर जमा करण्याची परंपरा कायम ठेवणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी धाराशिव येथील जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे, अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन बिलाची रक्कम घ्यावी. त्याचबरोबर ज्यांनी अद्याप खाते दिलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे, असेही पाटील यांनी सांगितले.


















