धाराशिव : जिल्ह्यातील जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड ही ‘प्रथम अर्ज करेल त्याला प्राधान्य’ तत्वाद्वारे केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पहिल्या टप्यात एक लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. या खर्चापैकी व्हीएसआय ९२५० रुपये, साखर कारखाना ६७५० रुपये व शेतकऱ्यांचा हिस्सा ९ हजारांचा राहणार आहे. जिल्ह्यात हे तंत्रज्ञान १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. साखर कारखान्यांना शेतकरी व गावांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किर्ती पुजारी यांनी दिली. एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत धोरण ठरविण्याच्या बैठकीला १६ साखर कारखान्यांचे प्रमुख उपस्थित होते.
सध्या धाराशिव जिल्ह्यात काही शेतकरी एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन घेताहेत. हे अधिक शेतकऱ्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये ज्या गावांत उसाचे क्षेत्र अधिक आहे व ठिबक सिंचनाचा वापर करतात, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार. किमान २५ ते ४० शेतकऱ्यांचा एक समूह करण्यात येणार आहे. सुरुवातीला मातीचा नमुना तपासून घेणे आवश्यक आहे. एकाच प्रकारची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र एकत्रित असेल, तर त्यांना एक हवामान केंद्र व दोन मातीतील सेन्सरसाठी ९,००० रुपये भरावे लागतील. उर्वरित सर्व रक्कम साखर कारखाना आणि व्हीएसआयच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्राला मिळणार आहे. जिल्हा उपनिबंधक अधिकारी रवींद्र माने, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे आदी बैठकीस उपस्थित होते.