धाराशिव : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आगामी गळीत हंगामासाठी रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती अध्यक्ष गोरे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, कारखान्याच्यावतीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्च कमी पाणी लागणार असून, उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एक हजार शेतकऱ्यांकडे ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट आहे.
अध्यक्ष गोरे म्हणाले की, यावर्षी आपण प्रतिदिन आठ हजार टन ऊस पुरवठा होण्याच्या दृष्टीने यंत्रणा भरती करत आहोत. यावर्षी कारखान्याकडे १५ हजार हेक्टर ऊस नोंद झाली असून, त्यापासून १२ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. यावर्षी सर्व युनिट पूर्ण कार्यक्षमतेने चालतील. आसवनी प्रकल्पाकडे यावर्षी सिरपपासून इथेनॉल निर्मिती करणार आहोत. आसवनी प्रकल्प २८० दिवस कसा चालेल, या अनुषंगाने नियोजन करीत आहोत. ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणेचा करार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ९० टक्के करार पूर्ण झाले आहेत. करार यंत्रणेस पहिला ॲडव्हान्स हप्ता वाटप झालेला आहे. हंगाम सभासद, ऊस उत्पादक, ठेकेदार व कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे पार पाडू, असे अध्यक्ष गोरे यांनी सांगितले.