धाराशिव : रुपामाता उद्योग समुहातील रुपामाता नॅचरल शुगर प्रा. लिमिटेडच्या पाडोळी (आ.) येथील युनिटच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. या विस्तारीकरणामुळे कारखान्याची सध्या असलेली प्रतिदिन ८०० टन गाळप क्षमता थेट २००० टनांनी वाढून एकूण २८०० मे. टन झाली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रकल्पाचे मोळीपूजन व उद्घाटन तुळजाभवानी मंदिराचे महंत योगी मावजीनाथ महाराज, ॲड. पांडुरंग लोमटे महाराज, सुधाकर गुंड गुरुजी, रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते पार पडले. या विस्तारीकरणामुळे परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत पूर्ण क्षमतेने व जलद गतीने गाळप होणार आहे. एकाही शेतकऱ्याच्या ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, असा विश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.
कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड-पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प यशस्वी झाला. रुपामाता नॅचरल शुगरचा हा टप्पा म्हणजे रोजगारनिर्मिती व ग्रामीण विकासाचा ठोस जाहीरनामा ठरला आहे असे मनोगत वक्त्यांनी व्यक्त केले. ॲड. व्यंकटराव गुंड यांनी ग्रामीण भागात उद्योग उभारताना शेतकरी, कामगार व युवकांचे भविष्य केंद्रस्थानी असावे. या प्रकल्पामुळे थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असून स्थलांतराला आळा बसल्याचे त्यांनी नमूद केले. बापू शेख यांनी सूत्रसंचालन केले. अमोल गुंड यांनी प्रास्ताविक केले. सुरेश मनसुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपामाता उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

















