धाराशिव : सिद्धिविनायक परिवारातील कारखाने करणार तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील देवकरुळी येथील सिद्धिविनायक परिवारातील सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्रमांक एक व खामसवाडी येथील सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्रमांक दोन या दोन्ही गूळ कारखान्यांमध्ये आगामी गळीत हंगामासाठी रोलर पूजनाचा सोहळा उत्साहात झाला. कारखान्याच्यावतीने हंगाम २०२४-२५ मधील उर्वरित ऊस बिलाचा २०० रुपयांचा अंतिम हप्ता बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली. कारखान्यातर्फे यंदा तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

संस्थापक, अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सहकुटूंब धार्मिक पूजा करण्यात आली. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की, मागील हंगामात सुमारे सव्वादोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले होते. या वर्षी तीन लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक गाळप केले जाईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी जलद पेमेंट व्यवस्था ठेवण्यात आली असून, ऊस खरेदीनंतर अवघ्या १५ ते ४५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. यावेळी दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, बालाजी कोरे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, देवीदास कुलकर्णी, गजानन पाटील, मंगेश कुलकर्णी, विकास उबाळे, अभय शिंदे, बालाजी जमाले, संजीव शीलवंत, मकरंद ढोबळे आदी उपस्थित होते. प्रतीक देवळे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here