धाराशिव : जिल्ह्यात यंदा गाळप हंगाम सुरू केलेल्या १४ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडांमध्ये १२५ हून अधिक हार्वेस्टर ऊसतोडणी करीत आहेत. ऊसतोड टोळ्यांच्या तुलनेत हार्वेस्टरची तोडणी शेतकरी, तसेच कारखान्यांसाठी फायदेशीर ठरू लागली आहे. शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी टोळी बोलविताना अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागतो. मुकादम टोळी शेतात पाठविण्यासाठी पैसे घेतात. टोळीतील सदस्यांवरदेखील अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतातून ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. ती टाळण्यासाठी हार्वेस्टरचा वापर पुढील काही वर्षांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ऊसतोडणी आणि मोळी उचलून ती ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी दणकट मजुरांची गरज असते. सोपी आणि कमी वेळात होणारी इतर कामे उपलब्ध झाल्याने अधिक कष्टाच्या असलेल्या ऊसतोडणीकडे मजूर पाठ फिरवू लागले आहेत. टोळ्या आणि त्यातील मजूर सदस्यांची संख्या कमी होत आहे. टोळी तयार करण्यासाठी मुकादमांसाठी सोपे राहिलेले नाही. यापुढे ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या कमी होत जाण्याची शक्यता आहे. याशिवाय मुकादमाकडून उचल घेऊन कारखान्यांची फसवणूक होण्याच्या घटनाही सातत्याने घडतात. या सर्व गोष्टींमुळे कारखाने हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीवर भर देऊ लागले आहेत. सद्यस्थितीत ‘नॅचरल शुगर’ कडे २६ हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी केली जात आहे.


















