धाराशिव : सुरेश पाटील शुगर ॲण्ड ॲग्रोच्या हंगामाची सांगता, कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

धाराशिव : सुरेश पाटील शुगर ॲण्ड ॲग्रो या जागरी पावडर कारखान्याने गेल्या १५१ दिवसांच्या गळीत हंगामात एक लाख ९५ हजार टन उसाचे गाळप केले. सरासरी १५ टक्के साखर उताऱ्याच्या प्रमाणात सुमारे २ लाख ९५ हजार क्विंटल गूळ पावडरीचे उत्पादन घेण्यात आले. चेअरमन सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १६) गाळप हंगामाची सांगता करण्यात आली. जिल्ह्यात सर्वप्रथम गाळप सुरू करून सर्वांत शेवटी सांगता करणाऱ्या या कारखान्याने उत्पादन आणि गाळपातही आघाडी घेतल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली. यावेळी सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी चेअरमन पाटील यांनी कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे नमूद करीत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना १५ दिवसांचा पगार बोनस देण्याची घोषणा केली. ही रक्कम तत्काळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कारखान्याने ऊस गाळप झाल्यानंतर दर १५ व्या दिवशी प्रतिटन २,७०० रुपये या दराने बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत असे सांगण्यात आले. उद्योग समुहाच्या कसबे तडवळे येथील सोयाबीन प्लांट आणि घाटसावळी (ता. बीड) या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. मुख्य अभियंता राजाभाऊ लोंढे, प्रताप चौरे, चीफ केमिस्ट चंद्रसेन मारवडकर, शेतकी अधिकारी गंगाधर गुंड, अभियंता मंगेश पोदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here