धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील गळीत हंगामाने वेग घेतला आहे. गेल्या अडीच महिन्यांत जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ४१ लाख ४५ हजार ६६९ टन ऊस गाळप केले आहे. वाढलेल्या साखर उताऱ्यामुळे आतापर्यंत २९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळप हंगाम अजून महिना-दीड महिना चालणार असल्याने त्यात आणखी मोठी वाढ होणार आहे. एकूण साखर उतारा ७.२ टक्के इतका आला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी सुमारे २७ लाख १२ हजार ५९४ टन उसाचे गाळप केले होते. त्यातून १८ लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. मागील हंगामाच्या तुलनेत यंदाच्या गाळपाने वेग घेतला आहे. त्यामुळे ऊस गाळप आणि साखर उत्पदनात यंदा विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यात सहा सहकारी आणि आठ खासगी कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. सहा सहकारी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता २२ हजार २५० टन आहे. या कारखान्यांनी गुरुवारअखेर १४,६८,९५४ टन उसाचे गाळप करीत १०,५९,६१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उतारा ७.२१ टक्के आहे. आठ खासगी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ३१ हजार ७५० टन आहे. या कारखान्यांनी २६,७६,७१५ टन उसाचे गाळप करून १९,२३,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा उतारा ७.१९ टक्के आहे. जिल्ह्यात रांजणीच्या नॅचरल शुगर कारखान्याने आतापर्यंत पाच लाख ८३ हजार ७८० टन गाळप करून आघाडी घेतली आहे. आयन मल्टिट्रेड कारखान्याने ४ लाख ७४ हजार ५३० टन ऊस गाळप केले आहे. समुद्राळ येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीजने ४ लाख ९ हजार ७५० टन गाळप केले आहे.
















