धाराशिव : यंदाचा ऊस गळीत हंगाम धाराशिवच्या साखर उद्योगासाठी संजीवनी ठरणारा आहे. साखर उद्योगाने विक्रमी भरारी घेतली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी संपूर्ण हंगामात अवघे २७ लाख १२ हजार टन गाळप झाले होते. यंदा मात्र हा आकडा हंगामाच्या अखेरपर्यंत दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. यंदा आतापर्यंत १४ कारखान्यांनी ५१,३४,१३८ टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत ३८ लाख ९३ हजार ८८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
जिल्ह्यात सध्या सहा सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यंदा साखर उताऱ्यातही सुधारणा झाली आहे. सरासरी साखर उतारा ७.५८ टक्के मिळाला आहे. रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर कारखान्याने सर्वाधिक ७,१९,९२० टन उसाचे गाळप करून अव्वल स्थान राखले आहे. त्यापाठोपाठ समुद्राळ येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीजने ५ लाख १० हजार ४०० टन गाळप केले असून लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली शुगरने ४ लाख ९८ हजार टन गाळप केले आहे. इंदापूरच्या नरसिंह कारखान्यात ३९ हजार ६४८ टन इतके सर्वात कमी गाळप झाले आहे. सहकारी कारखान्यांचा उतारा (७.६२ टक्के) खासगी कारखान्यांच्या (७.५६ टक्के) तुलनेत किंचित जास्त भरला आहे.

















