धाराशिव : कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्यातील वजन काट्यांची शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि. २०) अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व काट्यांमध्ये फरक न आढळता पूर्णतः अचूक असल्याचे भरारी पथकाने जाहीर केले. कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या नेतृत्वाखालील या पथकात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पथकाने वजन काट्यांवर वारंवार प्रमाणभूत वजने ठेवून आणि ऊस वाहनांचे दुबार वजन करून खात्री केली. या प्रक्रियेत कोणताही तांत्रिक दोष किंवा वजनात तफावत आढळली नाही.
तपासणी पथकात ढोकले यांच्यासह वैधमापन शास्त्र निरीक्षक वै. वि. स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. कोळेकर, लेखापरीक्षक के. एस. बोंदर, के. एस. टेळे यांचा समावेश होता. यावेळी शेतकरी प्रतिनिधी आणि वाहन चालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तपासणीनंतर नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की नॅचरल शुगर हा पूर्णतः शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे. इथे कोणतेही अनधिकृत काम केले जात नाही. जे काही करायचे ते पूर्ण इमानदारीने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच, हे आमचे धोरण आहे.


















