धाराशीव : यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, वेळेची बचत होते आणि ऊस वेळेवर कारखान्यांपर्यंत पोहोचतो. या व्यवसायामुळे केवळ शेतीत बदल नाही तर गावातील ग्रामीण विकासास चालना मिळते. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याने तरुण वर्ग शेतीशी जोडला जात आहे. केवळ या दृष्टिकोनामुळेच लोहारा तालुक्यातील करजगाव हे हार्वेस्टर व्यवसायासाठी आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. सुमारे २,२०० लोकसंख्येच्या या गावात सध्या १२ हार्वेस्टर आहेत. हार्वेस्टर व्यवसाय केवळ ऊस तोडणीपुरता मर्यादित न राहता, गावातील रोजगार, उत्पन्न वाढ, आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. करजगावमधील हा यशस्वी प्रयोग ग्रामीण भागासाठीही आदर्श ठरतो.
सध्या ऊस तोडणीत मोठी क्रांती झाली आहे. पारंपारिक पद्धतीने टोळीच्या माध्यमातून ऊस तोडायला तीन दिवस लागायचे. हार्वेस्टरच्या माध्यमातून फक्त पाच तासांत एकरभर ऊस कापता येतो हे लक्षात घेऊन गावातील पंडित जाधव यांनी सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातील चार-पाच जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन माहिती गोळा केली, नंतर २०१८ मध्ये करजगावमध्ये हा व्यवसाय सुरू केला. हार्वेस्टर चालवण्यासाठी ८ वाहन आणि १५ कर्मचाऱ्यांची टीम आवश्यक असते. या व्यवस्थेमुळे सुमारे २०० लोकांना नियमित रोजगार मिळतो असे ते सांगतात. शेतीशी निगडित एखादा व्यवसाय करावा असे मला खूप दिवसांपासून वाटत होते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू केला. या माध्यमातून गावातील व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकलो याचे समाधान आहे असे त्यांनी सांगितले. अमोल गांजनखेडे यांनी सहा वर्षापासून हा व्यवसाय करीत असल्याची माहिती दिली.

















