धाराशिव : यंदा पावसाचे प्रमाण जेमतेम असूनसुद्धा उसाचे पीक चांगले आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कळंब तालुक्यातील शिरढोणसह परिसरातील गावांमध्ये रानडुक्कर धुडगूस घालत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. एका रात्रीत रानडुकरांचा कळप अक्षरश: एक एकर ऊस जमीनदोस्त करतो, असे शेतकरी सांगत आहेत. त्याबरोबर शेतकऱ्यांनी तारेचे कुंपण, जाळ्या, साड्या बांधणे, तसेच भोंगे आणि मशीन बसवणे यांसारखे अनेक उपाय केले; परंतु याचा फारसा उपयोग झाला नाही. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु, वन विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
रानडुकरांचे कळप रात्रीच्या वेळी शेतात घुसून उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. रानडुकरांचा कळप मोठा असल्यामुळे त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचा टिकाव लागत नाही. काही शेतकरी फटाके फोडून किंवा जोरजोरात आवाज करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्याचाही काही उपयोग होत नाही. याबाबत शिराढोणचे शेतकरी नासेर पठाण म्हणाले की, मी आठ एकरांत उसाची लागवड केली आहे. आज हे पीक चांगले आले आहे, पण मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी उसाच्या पिकाची नासाडी करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री २० गुंठ्यांतील ऊस पायदळी तुडवून मोठे नुकसान केले आहे.