धुळे : जिल्ह्यातील साक्रीतील पांझरा कान, दहीवद (ता. शिरपूर) येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद आहेत. साक्री, शिरपुरात उसाची लागवड अधिक असते. या भागात कारखाना नसल्याने अडचण आहे. साखर कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील उसाची तोडणी किंवा खरेदी नाशिक, छत्रपती संभाजीगर, गुजरात व नंदुरबारातील कारखाने करीत आहेत. या भागातील साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन केले जावे, अशी मागणी केली जात आहे. हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची मागील सतत झाली. पण दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
शिरपूर साखर कारखाना शिरपूर तालुक्यातील सर्वांत मोठा सहकारी प्रकल्प आहे. कारखाना बंद स्थितीत असल्याने तालुक्यासह परिसरातील अर्थव्यवस्था फारशी गतिमान नाही. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून कारखाना बंद असल्याने कारखान्याच्या मालमत्तेची झीज होऊन सर्व यंत्रणा खराब झाली आहे. दहीवद येथील कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मागील वर्षी सभासदांनी विशेष सर्वसाधारण घेऊन बहुमताने मंजुरी दिली होती. यासाठी निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली. परंतु या प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नाही. शिरपूर शेतकरी सहकारी साखर शिरपूर, साक्री व नजीकच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यासाठी लाभदायी आहे. हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अधिक प्रयत्न करण्यची गरज आहे.


















