मुंबई : राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून सरकारने मंगळवारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती केली. त्यांची दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती.मागील महिन्यात तत्कालीन साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदली झाली. दरम्यान, साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे देण्यात आला होता.
डॉ. संजय कोलते यांनी मुंबईतील बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजमधून पशुवैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स) मिळवली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०१० बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. कोलते यांनी साखर आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यामध्ये,
व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित
जिल्हाधिकारी, भंडारा जिल्हा
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML)
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (PSCDCL)
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद, उस्मानाबाद
आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS)
साखर आयुक्तालय सध्या आगामी ऊस गाळप हंगाम 2025–26 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. आगामी वर्षात विक्रमी ऊस गाळप होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत 1 नोव्हेंबर 2025 पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.