ठिबक सिंचनाने ऊसपीक घेतल्यास जमिनींची उत्पादन क्षमता वाढते : विजय माळी

पुणे : विजय माळी लिखित ‘ऊस पिकासाठी ठिबक सिंचन -एक यशस्वी तंत्रज्ञान’ या पुस्तकामध्ये ऊस पिकासाठी बेसुमार पाणी वापर केल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो हेक्टर ऊस जमिनी खारवट, खारवट-चोपण व चोपण झालेल्या आहेत. त्यामुळे ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मर्यादा येत आहेत. पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीत जाणारे क्षारांचे प्रमाण व ते गेलेले क्षार धुवून जाण्यासाठी वार्षिक किती पाऊसमान होण्याची आवश्यकता आहे, ही माहिती या पुस्तकामध्ये संदर्भासहित देण्यात आली आहे.

ठिबक सिंचनाने ऊसपीक घेतल्यास जमिनी कशाप्रकारे सुधारून जमिनींची उत्पादन क्षमता वाढते याचा ऊहापोह पुस्तकात केला आहे. जमिनीमध्ये कायमस्वरूपी वाफसा निर्माण करण्यासाठी ऊसपिकाच्या वाढी व गरजेनुसार शास्त्रीयदृष्ट्या व ठिबकद्वारे किती पाणी द्यायला पाहिजे याची सखोल माहिती माळी यांनी या पुस्तकात दिली आहे. ठिबक सिंचनचे आयुष्य वाढविण्यासाठी ठिबकची निगा व काळजी, आम्लप्रक्रिया, क्लोरीन प्रक्रिया व दुरुस्ती इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले आहे.

ऊसाचे एकरी ८० ते १५० मे. टन उत्पादन घेण्यासाठी पिकाच्या वाढीनुसार आवश्यक अन्नद्रव्यांची मात्रा ठिबकद्वारे कशी व केव्हा द्यावी, याचे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार रासायनिक खतांचा वापर केल्यास निश्चितच ऊस उत्पादन साध्य करता येईल. ऊसाचे दर्जेदार बेणे, जमिनीनुसार दोन सरीतील अंतर ठिबक सिंचनाचा प्रकार, आंतरमशागत कशा पद्धतीने करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. ऊसाच्या पानांची लांबी-रुंदी, फुटवा व पांढरी मुळीची वाढ करण्यासाठी विविध संप्रेरकांचा वापर कधी व कसा करावा, याचे वेळापत्रक दिलेले आहे.

ऊसाच्या उत्पादनात १२ ते १५ टक्के ऊस उत्पादन वाढीसाठी दक्षिण-उत्तर ऊसाची लागवड करावी याचा संदर्भासहित समावेश या पुस्तकात केलेला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अधिक उत्पादन घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा नमूद करण्यात आलेले आहेत. तरी हे पुस्तक वाचून बारकावे समजून ऊस शेती केल्यास निश्चितच एकरी १०० ते १५० मे. टनापर्यंत उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा दावा माळी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here