नजीबाबाद : भागुवाला ऊस खरेदी केंद्रात ऊस वजन केला जात नसल्याने शेतकऱ्यांचा शेतांमध्ये तोडणी करून तयार असलेला ऊस वाळू लागला आहे. शेतकऱ्यांना उसाची तोडणी पावती जारी करण्यात आली आहे. मात्र, त्याचे वजन करण्यात आलेले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. भागुवाला आणि मिर्झापूर गावचे शेतकरी भागुवाला ऊस खरेदी केंद्राच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करतात. विभागातील जवळपास ४० हून अधिक शेतकऱ्यांना भागुवाला ऊस खरेदी केंद्रामध्ये ऊस वजन करण्यासाठी तोडणी पावती जारी करण्यात आली. १५ नोव्हेंबर रोजी वजन केले जाणार होते. मात्र, काहीच प्रक्रिया झाली नाही. भागुवाला ऊस खरेदी केंद्र आता बरकातपूर साखर कारखान्याला जोडण्यात आले असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी ब्रह्मानंद, प्रमोद राजपूत, जयपाल, मुखतार, लक्ष्मण सिंह, ब्रह्मपाल यांनी सांगितले की, तोडणी पावती मिळाल्याने शेतकऱ्यांनी ऊस तयार करून ठेवला. आता तो शेतांमध्ये वाळू लागला आहे. ऊस खरेदी केंद्राला दुसऱ्या कारखान्याकडे समायोजित केल्याने वजन प्रक्रियेस उशीर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पेरणीस उशीर होणार आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत नजीबाबाद ऊस विकास समितीचे सचिव विजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी हे केंद्र बरकातपूर कारखन्याशी जोडले गेले आहे. दोन दिवसांत ऊस खरेदी केंद्रावर वजन प्रक्रिया सुरू होईल.


















