राजुरी : तालुक्यात यंदा रब्बी हंगामातील पीक पद्धतीमध्ये बदल दिसत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी जादा उत्पन्न देणाऱ्या कांदा, ऊस, फ्लॉवर याकडे लक्ष दिले आहे. राजुरी, उंचखडक, बेल्हे, आणे भागात गेल्या वर्षाच्या तुलनेत चालूवर्षी गहू, हरभरा, ज्वारीची खूप कमी लागवड झाली आहे. जुन्नरच्या पूर्व भागात कांदा आणि ऊस ही पिके बहरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्वारीसह हरभरा, गहू आदी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. तालुक्यातील पूर्व पट्ट्यात ज्वारी, गहू, हरभरा हेच रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. मात्र, यंदा पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे.
लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाण्याची कमी उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा पिकांकडे दुर्लक्ष करीत कांदा, ऊस, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांवरच भर दिलेला दिसत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्येच बदल केला आहे. खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद, मूग, सोयाबीन आदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शेतकरी संदीप मते यांच्या म्हणण्यानुसार, ऊस हे नगदी पीक आहे. त्याला हमीभाव मिळतो. कांदा पिकाला बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतात. गहू, हरभरा पिकांना फवारणी खर्च जास्त येतो.
















