पेट्रोल विक्रीची सुविधा असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या सर्व किरकोळ आउटलेटमध्ये E20 पेट्रोल उपलब्ध : मंत्री

नवी दिल्ली : स्वच्छ इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या (ओएमसी) सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर आता E20 पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांकडून E20 पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली. याबाबत, एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, देशाच्या मुख्य भूमीवर असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर E20 पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यातून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकतात.

सरकारने २०१४ पासून भारतात इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी कच्च्या मालाचा विस्तार, ईबीपी कार्यक्रमांतर्गत इथेनॉल खरेदीसाठी प्रशासित किंमत यंत्रणा, ईबीपी कार्यक्रमासाठी इथेनॉलवरील जीएसटी दर ५ टक्यापर्यंत कमी करणे, २०१८-२२ दरम्यान विविध इथेनॉल व्याज अनुदान योजना (ईआयएसएस) सुरू करणे, सहकारी साखर कारखान्यांसाठी मोलॅसिस तसेच धान्यांपासून इथेनॉल उत्पादनासाठी ऊस-आधारित डिस्टिलरीजचे मल्टी-फीडस्टॉक प्लांटमध्ये रुपांतर करण्यासाठी समर्पित अनुदान योजना, ओएमसी आणि समर्पित इथेनॉल प्लांटमध्ये दीर्घकालीन ओव्हरटेक करार (एलटीओए), इथेनॉलची उपलब्धता वाढवण्यासाठी इथेनॉलची मल्टिमोडल वाहतूक आणि इथेनॉलचे उच्च मिश्रण हाताळण्यासाठी इथेनॉल साठवण क्षमता वाढवणे यासारख्या इतर संबंधित पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

भारतात, तेल विपणन कंपन्यांनी जून २०२२ मध्ये पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले. हे लक्ष्य २०२१-२२ च्या ईएसवायच्या निर्धारीत लक्ष्यापेक्षा पाच महिने आधीच पूर्ण झाले. तर २०२२-२३ च्या ईएसवायमध्ये मिश्रणाचे प्रमाण १२.०६ टक्के आणि २०२३-२४ च्या ईएसवायमध्ये १४.६० टक्के इतके आहे. शिवाय, चालू ईएसवाय २०२४-२५ साठी, मिश्रण टक्केवारी ३० जून २०२५ अखेर १८.९३ टक्केपर्यंत वाढवण्यात आली आहे. जून २०२५ मध्ये, १९.९२ टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here