नवी दिल्ली : एप्रिल ते जून या कालावधीत, म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त असेल असा दावा अर्थतज्ज्ञांनी केला आहे. त्यांच्या मतानुसार भारताची जीडीपी वाढ ८.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने जूनच्या तिमाहीसाठी ८.३ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर रेटिंग एजन्सी ICRA ने जीडीपी वाढीचा अंदाज ८.५ टक्के वर्तवला आहे. आरबीआयने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के वर्तवला आहे. तर एप्रिल आणि जूनचा अंदाज ८ टक्के ठेवण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्यांच्या भांडवली खर्चामुळे जीडीपीत वाढ होत असल्याचे एसबीआय आणि इक्राने म्हटले आहे. रेटिंग एजन्सीने सांगितले की, २०२१ मध्ये वाढ संथ गतीने झाली. परिणामी आता जीडीपीत वेगवान वाढ दिसून येत आहे.
ICRA चा अंदाज आरबीआयच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. अनुकूल आधारभूत परिणाम आणि सेवा क्षेत्रातील सुधारणांमुळे वाढ मजबूत राहण्याची अपेक्षा आहे असे ICRA च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. मात्र, लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा जीडीपी वाढीचा वेग कमी राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.











