नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इथेनॉल-मिश्रित इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबाबतच्या दाव्यांचे खंडन केले. अशा प्रकारची चर्चा म्हणजे इथेनॉल मिश्रण योजनेला बदनाम करण्याचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. कॉम्प्रेस्ड बायोगॅस सुरू करताना असेच प्रयत्न केले गेले होते. तुम्हाला तुमच्या शेती, बायोमास, अन्नदाता आणि ऊर्जादाता यावर विश्वास असला पाहिजे. या गोष्टी यशस्वी होतील,” असा विश्वास त्यांनी केला. परिवहन मंत्रालयातील समकक्ष मंत्री नितीन गडकरी यांनी अशाच प्रकारचा दावा केल्यानंकर पेट्रोलियम मंत्र्यांचे हे वक्तव्य केले आहे. गुरुवारी त्यांनी अशाच प्रकारच्या दाव्यांना “राजकीयदृष्ट्या प्रेरित” म्हणून खंडन केले होते.
ब्राझीलच्या २७ टक्के इथेनॉल मिश्रणाचा संदर्भ देताना पुरी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत कोणत्याही इंजिन बिघाडाबाबत मी ऐकलेले नाही. ई २० सुमारे १० महिन्यांपूर्वी मूलभूत इंधन बनले, तेव्हापासून इंजिन बिघाड किंवा बिघाड झाल्याची एकही घटना घडलेली नाही. कॅलरीफिक मूल्य जास्तीत जास्त ३ टक्के कमी असू शकते. इथेनॉल यशस्वी असल्याचे सांगत पेट्रोलियम मंत्र्यांनी जोर दिला की, इंजिनमध्ये कोणतीही समस्या नाही. जर्मन आणि जपानी लोकही तेच इंजिन चालवत आहेत, ते तुम्हाला सांगतील की इंजिन बिघाड झाल्याचे कोणतेही प्रकरण नाही. अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. इथेनॉल मिश्रणासाठी जड मोलॅसेस स्वरूपाचा वापर केला जात आहे. भारताचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित, जागतिक स्तरावर सिद्ध, देशाच्या ऊर्जा स्वातंत्र्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आणि शेतकरी कल्याण सुनिश्चित करतो, असे भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने (इस्मा) म्हटले आहे. इथेनॉल-मिश्रित इंधन ही केवळ तांत्रिक निवड नाही – ती एक राष्ट्रीय अत्यावश्यकता आहे,” असे इस्माचे महासंचालक दीपक बल्लानी म्हणाले.