श्री छत्रपती कारखाना पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : श्री छत्रपती कारखाना पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. याचसाठी जय भवानी माता पॅनेलमध्ये कारखान्याला पूर्ववैभव मिळवण्यासाठी जास्तीत जास्त घटकांना, वेगवेगळ्या समाजाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्याला पुर्वीचे चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही तिन्ही नेते प्रयत्न करू. मात्र, त्यासाठी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवा. छत्रपती शिक्षण संस्थेला आर्थिक मदत करून ही संस्था नावारूपाला आणू. श्री छत्रपती कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. श्री छत्रपती कारखाना भवानीनगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, कारखान्यावर १७३ कोटींचा बोजा आहे. पुढील हंगाम सुरु करण्यासाठी ४६ कोटींची आवश्यकता असुन त्यासाठी ठेवी गोळा कराव्या लागतील. कारखान्याच्या निवडणुकीत विविध अफवा उठतील. पण माझ्या विचारांच्या लोकांनी गडबड करु नये. कारखान्यासाठी राज्य सरकारसह केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आपण वेळप्रसंगी मदत घेवू शकतो. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इच्छुक सर्व उमेदवार तुल्यबळ होते. मात्र, २१ जणांनाच उमेदवारी देणं शक्य होते. कोणी गैरसमज करु नका असे आवाहन केले. पॅनलप्रमुख पृथ्वीराज जाचक म्हणाले की, कोणाला चेअरमन करण्यासाठी ही निवडणूक नाही. कारखाना निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. यावेळी माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार, विविध पदाधिकारी उपस्थित होते. अमोल भोइटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here