पुणे : ऊस शेतीसमोर खालावलेली जमिनीची सुपीकता, मातीतील सेंद्रिय कर्बाचे घटणारे प्रमाण, अनियमित पर्जन्यमान व हवामान बदलामुळे निर्माण होणारा ताण, सिंचनाच्या पाण्याचा अमर्याद व अकार्यक्षम वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, ठिबक सिंचन सुविधांचा अभाव, बियाणे बदलाचा अभाव, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा अत्यल्प वापर तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा मर्यादित अवलंब इत्यादी आव्हाने आहेत. ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे कि,यावर मात करण्यासाठी कार्बन ऊस शेती हा एक प्रभावी व शाश्वत पर्याय ठरतो. यामध्ये हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धतींचा अवलंब केला जातो. व्यवस्थापनात सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, आंतरमशागत, ठिबक सिंचन, पीक अवशेष व्यवस्थापन तसेच जैवविविधता संवर्धन तंत्रांचा समन्वय साधला जातो, असे वसंतदादा शुगर इन्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अशोक कडलग यांनी सांगितले.
कार्बन व्यवस्थापनाचे उपाय करताना पाचट व्यवस्थापनावर भर देण्याची गरज आहे. ऊस तुटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे एक हेक्टरमध्ये ८ ते १० टन पाचट निघते. या पाचटाचा सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो. शेतामध्ये ऊस पाचट कुजविण्यासाठी हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २. ५ लिटर पाचट कुजविणारे द्रवरूप जिवाणू वापरले तर पाचट लवकर कुजते. शेतात पाचट कुजविल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून उपयुक्त जिवाणूंची वाढ चांगली होते. शेतीत ऊस उत्पादनासह मृदा सुपीकता वाढविणे, कार्बन संवर्धन हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धतींचा अवलंब करणे यावर भर दिला जातो. कार्बन ऊस शेतीत सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जैविक खते, आंतरमशागत, ठिबक सिंचन, पीक अवशेष व्यवस्थापन तसेच जैवविविधता संवर्धन या तंत्रांचा योग्य समन्वय साधला जातो. जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळण्यासाठी आणि नायट्रोजन या मुख्य अन्न घटकाचे प्रमाण सुधारून जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी विविध हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने ऊस उत्पादन वाढते, उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. यामुळे कार्बन शोषण प्रक्रियेला चालना मिळते. परिणामी हवामान बदलाचा परिणाम कमी होतो आणि पर्यावरणपूरक कार्बन ऊस शेतीला चालना मिळते.