इथेनॉल : उत्तर प्रदेशात इथेनॉल उत्पादन वाढीसाठी ६,७७२ कोटी रुपयांची नवीन खाजगी गुंतवणूक

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.५० अब्ज लिटरपेक्षा जास्त इथेनॉलचे उत्पादन झाले. राज्यात इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी खाजगी क्षेत्रदेखील उत्सुक आहे. राज्यात इथेनॉल क्षेत्रात ६,७७२ कोटी रुपयांची नवीन खाजगी गुंतवणूक आली आहे. १.०६ अब्ज लिटरची अतिरिक्त इथेनॉल उत्पादन क्षमता प्रकल्प उभारण्यासाठी खाजगी गुंतवणूकदार २६,७७२ कोटी रुपयांच्या सुविधा उभारत आहेत. ‘बिझनेस स्टँडर्ड’ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. साखर उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी योगी सरकारने ५ वर्षांची रणनीती देखील राबवली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना इथेनॉल मिश्रण वाढवण्यासाठी प्रयत्न जलद करण्यास सांगितले आहे. ऊस आणि अन्नधान्य दोन्हीपासून इथेनॉल तयार करता येते. इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास तसेच स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षेलाही मदत होऊ शकते. राज्यात सुमारे ५० लाख ग्रामीण कुटुंबे उसाचे उत्पादन करतात. १२२ साखर कारखान्यांकडून उसापोटी शेतकऱ्यांना वार्षिक ३४,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली जाते. याशिवाय, राज्याची एकूण ऊस अर्थव्यवस्था ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात, २०२४-२५ मध्ये, राज्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना ३४,४६६ कोटी रुपयांच्या ऊस बिलांपैकी सुमारे ८४ टक्के रक्कम अदा केली आहे. तर सरकारी आकडेवारीनुसार, आधीच्या वर्षी राज्यात कार्यरत १०२ डिस्टिलरीजमधून १.५० अब्ज लिटरपेक्षा जास्त इथेनॉलचे उत्पादन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here