नवी दिल्ली : देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण २०१४ मध्ये १.५ टक्क्यांवरून आज २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गेल्या ११ वर्षांत ही वाढ १३ पट झाली आहे. त्यामुळे परकीय चलनात १.४४ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. देशाने यातून लक्षणीय आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित परिषदेत मंत्री जोशी बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा उपस्थित होते. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देण्यास मदत होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदारांचे उत्पन्न वाढल्याचा दावाही जोशी यांनी केला.
जोशी यांनी इथेनॉल मिश्रण, ऊर्जा सुरक्षा आणि ग्रामीण भागातील समृद्धी भाष्य केले. त्यावेळी त्यांनी साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढण्यासह जागतिक बाजारात इथेनॉल निर्यात करण्याकडे लक्ष देण्याचं आवाहन केले. जोशी म्हणआले की, गेल्या दशकात भारतीय साखर क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. साखर क्षेत्रातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी जैवइंधन आणि इथेनॉल मिश्रित कार्यक्रमावरील राष्ट्रीय धोरण आहे. ज्यामध्ये जैवइंधनाच्या प्रचारावर, साखर कारखान्यांच्या उत्पादनांच्या विविधीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे, त्यामुळे एक नवीन अक्षय स्रोत निर्माण होईल. तर केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी यावेळी यंदा २०२५-२६ च्या हंगामा, ३४.९ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज जारी झाला असून ४.५-५ दशलक्ष टन साखर इथेनॉलकडे वळवण्याची क्षमता देखील अधोरेखित केली.